BULDHANA कारवाईसाठी गेलेल्या revenue महसूल कर्मचाऱ्यांवर रेती माफियांच्या हस्तक टोळीचा attack हल्ला - Apala Vidarbha LIVE

Breaking

Thursday, March 28, 2024

BULDHANA कारवाईसाठी गेलेल्या revenue महसूल कर्मचाऱ्यांवर रेती माफियांच्या हस्तक टोळीचा attack हल्ला


आपला विदर्भ LIVE  देवानंद सानप 

सिंदखेडराजा तहसीलदार व त्यांचे कर्मचारी अवैध रेती उपसा व वाहतूक करणाऱ्या माफियांच्या हस्तकांना रंगेहाथ पकडून कारवाई करण्यासाठी तालुक्यातील निमगाव वायाळ शिवारातील खडकपूर्णा नदीपात्रात गेले असता रेती माफियांच्या हस्तकांच्या टोळीने दोन कर्मचाऱ्यांना बदडल्याची घटना दि. २६ मार्चच्या सायंकाळी ६.३० ते ७.०० वा. दरम्यान घडली आहे. याप्रकरणी किनगावराजा पोलिस ठाण्यात ४० ते ५० अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तहसीलदार सचिन जैस्वाल व त्यांचे तलाठी कर्मचारी यशवंत घरजाळे, विष्णू थोरात व पथकातील इतर कर्मचारी अवैध रेती चोरी करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यासाठी काल दि. २६ मार्च, मंगळवारी तालुक्यातील निमगाव वायाळ येथील खडकपुर्णा नदीपात्रात गेले होते. त्यावेळी सुमारे ४० ते ५० इसम चार ट्रॅक्टर मध्ये रेती भरतांना आढळून आले. मोबाईल मध्ये शूटिंग करत चारही ट्रॅक्टर पथकाने ताब्यात घेतले. याच दरम्यान ट्रॅक्टरचे चालक व ४० ते ४५ हस्तक पळून गेले. मात्र थोड्याच वेळात पळून गेलेले वाहन चालक व हातात फावडे घेतलेले हस्तक मजूर हे जप्त केलेल्या ट्रॅक्टर जवळ परतले. एका ट्रॅक्टर चालकाने तलाठी कर्मचारी यशवंत घरजाळे, विष्णू थोरात यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जर ट्रॅक्टरचा पाठलाग केला तर जीवे मारण्याची धमकी दिली. नव्हेतर काहींनी दोघा तलाठ्यांना फावड्याने मारहाण केल्याचे निमगाव वायाळ येथील प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर तीन ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले. ह्या सर्व प्रकाराच्या आवाजाने निमगाव वा याळ येथील ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. तर चौथे ट्रॅक्टर पळवून नेण्याचा प्रयत्न करीत असतांनाच तहसीलदार सचिन जैस्वाल व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. 

त्यानंतर चौथे ट्रॅक्टर महसूल विभागाने ताब्यात घेतले. याप्रकरणी किनगावराजा पोलिस ठाण्यात अप. नं. ७२/२०२४ कलम ३५३, ३७९, ५०६, १४३, १४७, १४९ भादंवि सहकलम महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७), ४८(८) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे तालुक्यातील 'तेरी भी चूप और मेरी भी चूप' यातून सुरु असलेल्या रेती माफियांच्या कारवाया जगजाहीर झाल्या आहेत. आता हे प्रकार बंद होतात की काही दिवसांनी पुन्हा चालू होतात? याकडे खडकपूर्णा नदीच्या तीरावरील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Post Top Ad

-->